जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

वेंगुर्ल्यात मुंबई विद्यापीठाचे मरीन स्टडीज केंद्र उभारणार

दादा सारंग • 28 October 2026, 04:53 PM

सिंधुदुर्ग : मुंबई विद्यापीठाच्या मरीन स्टडीज केंद्राची स्थापना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीत करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सागरी अभ्यास, उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात व्यापक संधी उपलब्ध होणार असून, सिंधुदुर्गच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.




मरीन स्टडीज केंद्राच्या माध्यमातून सागरी विज्ञान, मत्स्यव्यवसाय, सागरी तंत्रज्ञान तसेच संबंधित विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संशोधनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सागरी क्षेत्राशी संबंधित शिक्षणासाठी जिल्ह्यातच दर्जेदार पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.




या केंद्राच्या स्थापनेसंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, याच अनुषंगाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी मंत्रालयात भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.




यावेळी केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय बाबी, प्रलंबित कार्यवाही आणि पुढील नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्राच्या उभारणीची तयारी तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)