जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
देश

वेंगुर्लेत आसोली रांजणवाडीत बंधारा

दादा सारंग • 29 September 2026, 08:24 AM

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्याच्या उद्देशाने आसोली-रांजणवाडी येथील वहाळावर भाजपचे ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी व ग्रामस्थांच्या पुढाकारातून बंधारा उभारण्यात आला. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.


वहाळातील पाणी अडविल्यामुळे परिसरातील विहिरी व अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन जलसंधारणाचे काम हाती घेतल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. भविष्यातही गावातील विविध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.


यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, या.का.का. सदस्य गुरुनाथ घाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी यांच्या पुढाकाराला ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)