जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

वेंगुर्ला तुळस-पलतड येथे घोणस सापाचे सर्पमित्र महेश राऊळ यांनी केले सुरक्षित रेस्क्यू

दादा सारंग • 05 November 2026, 04:41 AM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस-पलतड येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष तुषार राय यांच्या शेतमांगराच्या बाजूला अत्यंत विषारी घोणस साप आढळून आला. या सापाला सर्पमित्र महेश राऊळ यांनी सुरक्षितपणे रेस्क्यू केले.




घोणस अर्थात रसेल वायपर (Russell's Viper) हा महाराष्ट्रासह कोकणात आढळणाऱ्या अत्यंत विषारी सापांपैकी एक आहे. भारतातील 'बिग फोर' या चार प्रमुख विषारी सापांच्या यादीत त्याचा समावेश होतो. या सापाचा रंग पिवळसर तपकिरी असून, शरीरावर गडद तपकिरी रंगाचे तीन रांगांमध्ये साखळीसारखे गोलाकार ठिपके असतात. त्याचे डोके त्रिकोणी, मोठे आणि मानेपासून वेगळे दिसणारे असते. डोळ्यांची बाहुली उभी असते. साधारणपणे या सापाची लांबी तीन ते पाच फुटांपर्यंत असते असे महेश राऊळ यांनी सांगितले.




घोणस साप डसण्यापूर्वी कुकरच्या शिट्टीसारखा 'फुस्स... फुस्स...' असा मोठा आवाज काढतो. हा आवाज म्हणजे त्याच्याकडून दिला जाणारा धोक्याचा इशारा असतो. शेतातील गवत, दगडांचे ढिगारे, उंदरांची बिळे अशा ठिकाणी तो आढळतो. उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य असल्याने तो अनेकदा शेतात तसेच मानवी वस्तीजवळही येतो.




घोणस साप तुलनेने संथ हालचाल करणारा असला तरी तो अत्यंत चिडखोर स्वभावाचा असतो. धोका जाणवल्यास तो पळून जाण्याऐवजी जागेवरच गुंडाळी करून बसतो आणि जवळ गेल्यास वेगाने हल्ला करू शकतो. त्याचे विषारी दातही लांब असतात. थंडीच्या दिवसांत प्रजननाशी संबंधित हालचालींमुळे एकाच परिसरात दोन-तीन किंवा त्यापेक्षा अधिक घोणस साप आढळण्याची शक्यता असते.




या सापाचे विष हिमोटॉक्सिक (Hemotoxic) स्वरूपाचे असून, त्याच्या दंशामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. इतर अनेक सापांप्रमाणे घोणस अंडी बाहेर घालत नाही, तर तो थेट पिल्लांना जन्म देतो. मात्र, तो सस्तन प्राणी नसून त्याच्या शरीरातच अंड्यांचा विकास होऊन पिल्ले जन्माला येतात.




घोणस हा अत्यंत विषारी साप असल्याने नागरिकांनी त्याला स्वतः पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये असे राऊळ यांनी म्हटले आहे. साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखून प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात येत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)