जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

वेंगुर्ले शहरात २७६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण

दादा सारंग • 28 October 2026, 08:28 AM

वेंगुर्ला स्वरूपा सौदागर✍️ : शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांची सुरक्षितता तसेच सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध भागांतून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण आणि लसीकरणाची प्रक्रिया करण्यात आली.




भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा धोका कमी करणे, त्यांच्या संख्येवर दीर्घकालीन नियंत्रण मिळविणे तसेच रेबीजसारख्या गंभीर आजारांचा प्रसार रोखणे, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे.




या मोहिमेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात राबविण्यात आला. या टप्प्यात वेंगुर्ले शहरातील एकूण १४३ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २० ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आणखी १३३ भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण व लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.




अशाप्रकारे मोहिमेच्या दोन्ही टप्प्यांत मिळून शहरातील एकूण २७६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे.




नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे, या उद्देशाने नगरपरिषदेकडून यापुढेही आवश्यक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येणार आहेत.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)