जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
गुन्हेगारी

वडिलांच्या जाचाला कंटाळून दोघा मुलांनीच केला वडिलांचा खून; रेडीच्या जंगलात मृतदेह टाकला!

दादा सारंग • 23 November 2026, 01:56 PM

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️: वडिलांकडून सतत होणारी मारहाण आणि दारूच्या नशेत दिला जाणारा त्रास असह्य झाल्याने दोन मुलांनी संगनमत करून वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडिलांचा मृतदेह रेडी येथील जंगलमय परिसरात टाकण्यात आला होता. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून छडा लावला असून, दोन्ही संशयितांना आरोंदा येथून ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका आरोपीचा अल्पवयीन भावाचाही समावेश आहे.




वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जंगलमय परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आणि मृत्यू संशयास्पद असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.




स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी, तांत्रिक विश्लेषण, स्थानिक पातळीवरील चौकशी आणि मानवी कौशल्याच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. या तपासादरम्यान हा नैसर्गिक मृत्यू नसून खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.०८ वाजता वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.




त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, रेल्वे प्रशासनाकडून मिळालेली माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले. मृत व्यक्तीचे नाव दाऊद मुसाफीर शेख (वय ५६, मूळ रा. वृंदावन टोला, नरदरवा, सितालपूर, पूर्व चंपारण, बिहार) असे असल्याचे निष्पन्न झाले.




मयताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि नातेवाईकांची माहिती घेतल्यानंतर पोलिसांना या खुनामागे त्याच्याच मुलांचा हात असल्याचा संशय आला. त्यानुसार नजरे दाऊद आलम (वय ३१) आणि त्याचा अल्पवयीन भाऊ, दोघेही मूळचे बिहारमधील असून सध्या आरोंदा, रेडकरवाडी, ता. सावंतवाडी येथे वास्तव्यास होते, यांची माहिती निष्पन्न झाली.




पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी पहाटे आरोंदा येथे सापळा रचून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मृत व्यक्ती आपले वडील असल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वडील सतत दारू पिऊन कुटुंबीयांना त्रास देत तसेच मारहाण करीत असल्याने त्यांच्या जाचाला कंटाळून दोघांनी संगनमताने त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेह लपविण्याच्या उद्देशाने रेडी येथील जंगलमय परिसरात नेऊन टाकल्याचेही समोर आले आहे.




या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरा संशयित विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्याच्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.




या गुन्ह्याचा यशस्वी तपास पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सुधीर सावंत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे, एटीबी, एसडीपीओ कार्यालय सावंतवाडी आणि सीसीटीएनएस विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.




या क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)