वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: विद्यार्थी म्हणून ज्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले, त्याच शाळेत शिक्षिका म्हणून ज्ञानदान करण्याची आणि पुढे त्याच शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळणे, हा प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण असतो. असा आगळावेगळा योग जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्यामंदिर, आसोली नं. १ येथील मुख्याध्यापिका श्रीमती वैभवी वसंत रायशिरोडकर यांच्या आयुष्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने एनसीईआरटीमार्फत त्यांना प्रतिष्ठेचा ‘आयडॉल टीचर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
सन २००४ मध्ये शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालेल्या वैभवी रायशिरोडकर यांनी बी.ए. आणि बी.एड. ही शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे. सध्या त्या एम.ए. एज्युकेशनच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असून डी.एस.एम. अभ्यासक्रमासाठीही त्यांनी प्रवेश घेतला आहे. रेडी नं. १ येथून त्यांच्या शिक्षकसेवेचा प्रारंभ झाला. या शाळेत आठ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी मळेवाड नं. २ येथे सहा वर्षे, तर आरवली नं. १ येथे सहा वर्षे अध्यापनाचे कार्य केले. सध्या त्या आसोली नं. १ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
विशेष म्हणजे आसोली नं. १ ही त्यांची स्वतःची शाळा आहे. याच शाळेत त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. ज्या शाळेने त्यांच्या आयुष्याला शिक्षणाचा पाया दिला, त्याच शाळेत शिक्षिका म्हणून सेवा करण्याची आणि आज मुख्याध्यापिका म्हणून शाळेच्या प्रगतीची जबाबदारी सांभाळण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या या यशामागे केवळ व्यावसायिक समाधान नसून बालपणीच्या आठवणींशी जोडलेली एक भावनिक आणि अभिमानास्पद कहाणीही दडलेली आहे.
गेल्या २१ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळेचा भौतिक व शैक्षणिक विकास आणि लोकसहभागातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात आरवली नं. १ येथे कार्यरत असताना त्यांच्या शाळेने वेंगुर्ला तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला होता. तर सध्या आसोली नं. १ येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली याच उपक्रमात शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सन २०२४ मध्ये ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’, तर सन २०२५ मध्ये ध्येय एज्युकेशन फाउंडेशन आणि राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याशिवाय वेंगुर्ला नगर वाचनालय संस्थेतर्फे त्यांच्या शाळेला ‘आदर्श शाळा पुरस्कार’, तर वैभवी रायशिरोडकर यांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने एनसीईआरटीमार्फत मिळालेल्या ‘आयडॉल टीचर’ पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिक्षणाप्रती निष्ठा, विद्यार्थ्यांविषयी माया, साहित्याविषयी आस्था आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या गुणांच्या बळावर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे व्यासपीठ बनावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
विद्यार्थीदशेत ज्या शाळेत स्वप्नांची पायाभरणी झाली, त्याच शाळेच्या विकासासाठी आज नेतृत्व करण्याची संधी मिळणे आणि आपल्या कार्यातून राज्यस्तरावर सन्मान प्राप्त करणे, ही वैभवी रायशिरोडकर यांच्या प्रवासातील निश्चितच प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचाही गौरव झाला असून, त्यांच्या कार्याचा प्रवास नव्या पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.