जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

ऊसाला यापुढेही जादा दर देण्याचा प्रयत्न : आ. सतेज पाटील

दादा सारंग • 28 October 2026, 08:09 AM

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याकडून एफ.आर.पी.पेक्षा अधिक दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात एफ.आर.पी.पेक्षा १७५ रुपये अधिक दर देण्यात आला असून, आगामी काळातही ऊसाला शक्य तितका चांगला दर देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी दिली.




पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे तब्बल ९ हजार ३४५ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळितासाठी पाठवून हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.




आमदार सतेज पाटील आणि संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून २४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक सहदेव कांबळे व त्यांच्या पत्नी सौ. मंगल कांबळे यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.




कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक, विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी, कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रविंद्र पाटील, महादेव पडवळ, धैर्यशिल घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, तानाजी लांडगे, पांडुरंग पडवळ, उदय देसाई आदी उपस्थित होते.




यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, सोनाली पाटील, सभापती छाया देसाई, सदस्य अमर कांबळे, शुभांगी संकपाळ, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील यांच्यासह कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, बँक स्थायी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कार्यक्रमाच्या उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक जयदिप पाटील यांनी केले, तर आभार सेक्रेटरी नंदू पाटील यांनी मानले.




दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल संबंधितांचे यावेळी हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)