वेंगुर्ला प्रतिनिधी ✍️: कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने दाखल केलेल्या धनादेश अनादराच्या प्रकरणात आरोपी संतोष लुडबे, रा. आजगाव, यांना वेंगुर्ला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेले अपील अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश क्र. २, श्री. इंदलकर यांनी दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी फेटाळून लावले. या प्रकरणात संस्थेच्या वतीने अॅड. अमोल मालवणकर व अॅड. सुरेंद्र तेली यांनी काम पाहिले.
कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शिरोडा शाखेतून संतोष लुडबे यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या अंशतः परतफेडीसाठी त्यांनी १ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, संबंधित धनादेशाचा अनादर झाल्यानंतर संस्थेने चलनक्षम दस्तऐवज अधिनियमाच्या कलम १३८अ अन्वये वेंगुर्ला न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.
या खटल्याची सुनावणी करताना वेंगुर्ला येथील कनिष्ठ न्यायालयाने आरोपी संतोष लुडबे यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच १ लाख ३४ हजार ५०० रुपयांची रक्कम ३० दिवसांच्या आत भरण्याचे आदेश दिले होते. निर्धारित मुदतीत ही रक्कम न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले होते. याशिवाय ५ हजार रुपयांचा दंड ३० दिवसांच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले होते. हा दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार होता.
कनिष्ठ न्यायालयाच्या या निकालाविरोधात आरोपी संतोष लुडबे यांनी अपील दाखल केले होते. अपीलच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी संस्थेच्या वतीने युक्तिवाद करताना कर्जाशी संबंधित नोंदी, कर्जदाराने भरलेल्या रकमांचा अचूक हिशोब, व्याजासंदर्भातील कायदेशीर तरतुदी व नियम तसेच कर्ज खात्यातील प्रत्यक्ष देय रकमेचा निश्चित हिशोब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
फिर्यादीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या बाबींचा विचार करून अतिरिक्त प्रधान जिल्हा न्यायाधीश क्र. २, श्री. इंदलकर यांनी आरोपीचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे वेंगुर्ला कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला दुजोरा मिळाला आहे.