जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

दिवाळीच्या आतषबाजीत केशवसुत कट्ट्याची विटंबना!

दादा सारंग • 09 November 2026, 12:02 PM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : सुंदरवाडीच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणाऱ्या मोती तलावाच्या काठावर यंदा दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत होता. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण तलाव परिसर उजळून निघाला होता. मात्र, या आनंदोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सावंतवाडीच्या सांस्कृतिक वारशाची झालेली दयनीय अवस्था पाहून मन सुन्न झाले. फटाक्यांच्या आतषबाजीच्या नावाखाली थेट मराठीचे आद्यकवी कविवर्य केशवसुत कट्ट्यालाच कचऱ्याचा आणि राखेचा विळखा पडल्याचे चित्र समोर आले आहे.




मोती तलावाच्या काठावर बसून कविवर्य केशवसुतांनी 'तुतारी', 'संध्याकाळ' यांसारख्या अजरामर काव्यरचना केल्या. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी याच परिसरात केशवसुत कट्टा उभारण्यात आला असून, त्यांच्या क्रांतिकारी 'तुतारी' कवितेचे प्रतीक म्हणून तुतारीची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. मात्र, याच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याच्या ठिकाणी दिवाळीच्या रात्री फटाक्यांची बेफाम आतषबाजी करण्यात आली.




दिवाळीचा आनंद साजरा करण्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. फटाके फोडावेत, उत्सव साजरा करावा; मात्र त्यासाठी शहराचा सांस्कृतिक वारसा पायदळी तुडवायचा का? हा खरा प्रश्न आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी केशवसुत कट्ट्यावर फटाक्यांच्या रिकाम्या खोक्यांचा खच, जळालेली सामग्री आणि काळ्या राखेचे साम्राज्य पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी मराठी साहित्याचा अभिमान जपला जायला हवा, त्याच ठिकाणाची अशी दुरवस्था होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.




केशवसुतांनी ज्या भूमीतून क्रांतीची तुतारी फुंकली, त्याच कट्ट्यावर आज अस्वच्छतेची राख साचावी, ही सावंतवाडीसाठी निश्चितच शरमेची बाब आहे. दिवाळीच्या आनंदात बेभान झालेल्या नव्या पिढीला आपल्या शहराचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि सार्वजनिक वास्तूंचे महत्त्व समजणार कधी? उत्सव साजरा करताना सामाजिक भान आणि सांस्कृतिक जाणीव हरवली आहे का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.




सावंतवाडी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनानेही या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांवर फटाक्यांची आतषबाजी करण्याबाबत योग्य नियमावली आखणे, अशा ठिकाणी देखरेख ठेवणे आणि उत्सवानंतर स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.




शेवटी एकच... दिवाळीच्या रोषणाईने शहर उजळले पाहिजे, पण त्या प्रकाशात आपल्या संस्कृतीचा वारसा काळवंडता कामा नये. फटाक्यांचा आवाज काही क्षणांत विरून जातो; मात्र अशा बेफिकिरीने झालेली हानी शहराच्या सांस्कृतिक जाणीवेवर कायमचा प्रश्नचिन्ह निर्माण करते.




दिवाळी साजरी करा, आनंद लुटा; पण आपल्या शहराचा सांस्कृतिक वारसा राखेत मिसळून नव्हे, तर अभिमानाने जपून!

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)