गोवा प्रतिनिधी✍️ : देशभरात दक्षता जागरूकता सप्ताह सुरू असतानाच गोव्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचाराविरोधात धडक कारवाई केली आहे. पत्रादेवी आणि मोले येथील अबकारी खात्याच्या तपासणी नाक्यांवर एसीबीच्या पथकाने अचानक छापे टाकत एकूण १३ हजार ७० रुपयांची संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. या कारवाईमुळे सरकारी वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी दहा कर्मचाऱ्यांना बुधवारी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
एसीबीचे अधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मोले येथील अबकारी तपासणी नाक्यावर निरीक्षक सतीश गावडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अचानक पाहणी केली. यावेळी नाक्यावर १० हजार ५७० रुपयांची रोकड आढळून आली.
दरम्यान, पत्रादेवी येथील अबकारी तपासणी नाक्यावर निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या नेतृत्वाखाली एसीबीच्या पथकाने तपासणी केली. या ठिकाणी २ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. दोन्ही ठिकाणांहून मिळालेल्या रकमेबाबत एसीबीकडून सखोल चौकशी सुरू आहे.
नाक्यांवर आढळून आलेल्या या रोख रकमेचा नेमका स्रोत काय आहे, ती कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आली होती आणि या व्यवहारामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जात आहे. तसेच या प्रकरणात कोणतीही अनियमितता अथवा लाचखोरी झाली आहे का, याचाही एसीबीकडून शोध घेतला जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित दहा कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बुधवारी एसीबीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. चौकशीनंतर या प्रकरणातील अधिक माहिती आणि संभाव्य कारवाई स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
देशभरात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह साजरा केला जात आहे. सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे हा या सप्ताहामागील प्रमुख उद्देश आहे.
विशेष म्हणजे, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, कार्यतत्परता आणि नागरिकांची कामे विनाविलंब पूर्ण करण्याचा संदेश दिला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांत एसीबीने केलेल्या या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आता एसीबीच्या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.