वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: श्री देव नारायण गौतमेश्वर काशी ब्राह्मण यांच्या कृपाशीर्वादाने दाभोली गावचा पहिला जत्रोत्सव रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी श्री देव नारायण गौतमेश्वर यांची विधिवत पूजा-अर्चा करून उत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री पारंपरिक पालखी सोहळा भक्तिभावात पार पडणार असून, यावेळी फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीने जत्रोत्सवाची रंगत अधिकच वाढणार आहे.
यानिमित्ताने खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग मंदिर परिसरात सादर केला जाणार आहे. तसेच जत्रोत्सवासाठी मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटली जाणार असून, खरेदी आणि मनोरंजनाची पर्वणीही भाविकांना अनुभवता येणार आहे.
दाभोली गावच्या पहिल्या जत्रोत्सवामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पंचक्रोशीतील भाविकांनी आणि नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देव नारायण गौतमेश्वर यांचे दर्शन, महाप्रसाद आणि जत्रोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.