जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

सावंतवाडी मतदारसंघात विविध ठिकाणी योगा सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न

दादा सारंग • 25 October 2026, 09:42 AM

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून प्रेरणा घेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये योगाविषयी जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद मतदारसंघांसह तिन्ही शहरांमध्ये योगाचे विविध उपक्रम राबविण्यासोबतच गरजेनुसार योगा सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी माहिती भाजपा युवानेते विशालजी परब यांनी दिली.




सावंतवाडी येथील मांगिरीश हॉलमध्ये फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित योग प्रशिक्षण शिबिराच्या समारोपावेळी प्रशिक्षणार्थींना विशालजी परब यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.




योगामुळे शरीराची तंदुरुस्ती वाढण्यासोबतच मानसिक स्वास्थ्य आणि संतुलित जीवनशैलीला चालना मिळते. त्यामुळे योगाकडे केवळ व्यायाम म्हणून न पाहता तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांपर्यंत योगाचे महत्त्व पोहोचवून अधिकाधिक लोकांना नियमित योगाभ्यासासाठी प्रोत्साहित केले जाईल. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर योग केंद्रे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे विशाल परब यांनी स्पष्ट केले.




या कार्यक्रमास योग प्रशिक्षक शेखर बांदेकर, संस्थेचे यशवंत आरोसकर, शिवा गावडे, निशिगंधा सावंत, रेवती सावंत यांच्यासह प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.




योगाचा प्रसार, आरोग्याचा ध्यास आणि निरोगी सावंतवाडीचा संकल्प, असा संदेश यावेळी देण्यात आला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)