जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

संतोष राऊळ यांची पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाच्या चेअरमन पदी निवड

दादा सारंग • 14 October 2026, 01:34 PM

सिंधुदुर्ग प्रतिनिधी ✍️: "परिस्थिती कितीही हलाखीची असली, तरी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर माणूस यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकतो," याचा जिवंत वस्तुपाठ म्हणजेच पत्रकार संतोष राऊळ. शिवापूर सारख्या दुर्गम आणि ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणाने आज पत्रकारिता क्षेत्रात आणि पत्रकार संघटनेत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पत्रकारांना हक्काची घरे मिळावीत यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्न केले, मात्र हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणारे संतोष राऊळ यांच्या कर्तृत्वाची दखल आता थेट शासकीय पातळीवर घेण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री नामदार श्री. नितेशजी राणे यांनी संतोष राऊळ यांची जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पत्रकारांसाठी उभ्या राहणाऱ्या महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाच्या चेअरमन पदी नुकतीच निवड केली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीमुळे संतोष राऊळ यांच्या खांद्यावर एक मोठी आणि जबाबदारीची धुरा आली असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कलंबिस्त हायस्कूलचे संस्कार आणि शिवापूर ते कणकवली प्रवास

संतोष राऊळ यांचे मूळ गाव शिवापूर. अत्यंत साध्या आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या संतोष यांचे माध्यमिक शिक्षण कलंबिस्त हायस्कूलमध्ये झाले. या शाळेत लागलेले शिस्तीचे आणि संघर्षाचे बाळकडू त्यांच्या पुढील आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, बेताचीच आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही.

उदरनिर्वाहाचे साधन आणि सोबतच समाजसेवेची आवड म्हणून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्र क्षेत्रात काम करत असताना, त्यांनी पडेल ती जबाबदारी स्वीकारली. अगदी तळागाळातील कामांपासून ते मुख्य प्रवाहातील पत्रकारितेपर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर होता. पण पूर्ण क्षमतेने आणि निष्ठेने त्यांनी प्रत्येक जबाबदारी पार पाडली आणि आज स्वतःची एक स्वतंत्र, करारी ओळख निर्माण केली.

स्वतःचे कुटुंब सावरता सावरता बनले अनेकांचा आधार

संतोष यांच्या या प्रवासाचा जवळून साक्षीदार राहिलेल्या त्यांच्या मित्रांच्या मते, संतोष यांनी केवळ स्वतःचा विचार कधीच केला नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतानाच, त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्रचंड कष्ट उपसले. स्वतःचे कुटुंब सावरता सावरता, पत्रकार बांधवांच्या अडीअडचणीला धावून जाणे, सामाजिक कार्यात अग्रभागी राहणे यामुळे ते कधी अनेकांचे आधारस्तंभ बनले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही.

पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प: स्वप्नपूर्तीचा ध्यास

जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना हक्काचे घर मिळावे, हे संतोष राऊळ यांचे एक मोठे स्वप्न होते. हा विचार केवळ मनात न ठेवता, त्यांनी तो तडीस नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची आणि संघटनेवरील पकडीची दखल घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्याकडे या गृहनिर्माण प्रकल्पाच्या चेअरमन पदाची चावी सोपवली आहे. या निवडीमुळे आता जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

एक संघर्षशील नेतृत्व...

संतोष राऊळ यांच्या शिवापूर ते कणकवली या प्रवासावर लिहिण्यासारखे खूप काही आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी सोसलेले कष्ट आणि त्यावर मात करत मिळवलेले हे यश आजच्या तरुण पिढीसाठी, विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. कलंबिस्त हायस्कूलच्या या विद्यार्थ्याने आपल्या संघर्षातून घेतलेली ही भरारी कौतुकास्पद आहे. संतोषजी राऊळ यांना या नवीन आणि अत्यंत त्यांच्या हातून आगामी काळात पत्रकार हितार्थ आणि समाजहिताची अशीच अनेक उत्तमोत्तम कामे घडोत, हीच सदिच्छा आणि जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल कडून मनःपुर्वक अभिनंदन.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)