वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वावर आज शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध रेडी येथील द्विभुज गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची रीघ लागली होती. धार्मिक विधी, मंत्रोच्चार, पूजाअर्चा आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
संकष्टी चतुर्थीनिमित्त रेडीच्या गणरायाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुलांसह फळांची सुंदर आरास आणि केळ्यांच्या घडांनी बाप्पाच्या मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलले होते. निसर्गरम्य परिसरात विराजमान झालेल्या गणरायाचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी झाली होती.
कोणी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी बाप्पाकडे साकडे घालत होते, तर कोणी जीवनातील संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होते. अनेक भाविकांनी गणरायाच्या चरणी नारळ, फुले अर्पण करून दर्शन घेतले. दूरवरून आलेल्या भक्तांसाठीही हा दर्शनसोहळा श्रद्धा आणि समाधानाचा अनुभव देणारा ठरला.
रेडीचा प्रसिद्ध द्विभुज गणपती हा भाविकांच्या श्रद्धेचे आणि अढळ विश्वासाचे स्थान मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या श्रद्धास्थानी भक्तीचा महासागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वत्र घुमणारा गणरायाचा जयघोष आणि भक्तांच्या चेहऱ्यावरील समाधान यामुळे मंदिर परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
श्रद्धा तीच, भक्ती तीच आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच जयघोष... गणपती बाप्पा मोरया!