वेंगुर्ला स्वरूपा सौदागर✍️ : वेंगुर्ला शहरातील प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन चर्चा करण्याचा निर्णय वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यापूर्वी भुयारी गटार योजनेबाबत आलेला अनुभव लक्षात घेता, भविष्यात तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींना नगरपरिषदेच्या सभागृहात बोलावून प्रकल्पाची संपूर्ण माहिती सादर करण्यास सांगावे. त्यानंतर चर्चा करूनच प्रकल्पाला मंजुरी द्यावी, असे सभेत ठरविण्यात आले.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायांगणकर, सचिन शेटये, सदानंद गिरप, विनय नेरुरकर, संदेश निकम, प्रीतम सावंत, सुधीर पालेकर, रवींद्र शिरसाट, प्रशांत आपटे, दाजी परब, युवराज जाधव, आकांक्षा परब, गौरी मराठे, गौरी माईणकर, काजल कुबल, रिया केरकर, सुमन निकम, शितल आंगचेकर, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, अॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांच्यासह नगरपालिकेतील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान, वेंगुर्ला शहरात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने नागरिकांना तिलारीचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दाभोली नाका ते नारायण तलाव अशी नवीन पाईपलाईन टाकण्याच्या प्रस्तावाला सभेत मंजुरी देण्यात आली.
तसेच निशाण तलावातून वडखोल परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेची पाईपलाईन जीर्ण झाली असून, तिच्या दुरुस्तीसाठी आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.
याशिवाय विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून माणिकचौक येथील व्यासपीठाच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामासाठी आवश्यक दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्याचेही सभेत निश्चित करण्यात आले.