जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड!

दादा सारंग • 27 November 2026, 06:36 AM

मुंबई प्रतिनिधी✍️ : राज्यातील मंजूर आणि अधिकृत इमारतींमधील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख व हक्क अभिलेख उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रारूप अधिसूचना २६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या मसुद्यावर नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अभिप्रायांचा विचार करून पुढील दोन महिन्यांत अंतिम नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.




या नव्या प्रणालीमुळे इमारतीतील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे संबंधित सदनिकेच्या मालकी हक्काची पडताळणी करणे अधिक सोपे होणार असून, मालमत्तेची खरेदी-विक्री तसेच बँकेकडून कर्ज मिळविण्याची प्रक्रियाही सुलभ होण्यास मदत होणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ केवळ मंजूर बांधकाम नकाशा आणि नोंदणीकृत हक्कदस्त असलेल्या अधिकृत इमारतींमधील सदनिकाधारकांनाच मिळणार आहे.




प्रत्येक सदनिकेसाठी तयार करण्यात येणाऱ्या स्वतंत्र प्रॉपर्टी कार्डवर सदनिकेचे क्षेत्रफळ, मालकाचे नाव, संबंधित मालमत्तेवरील हक्क, कर्ज तसेच अन्य बोजे यांची नोंद करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, विविध संबंधित विभागांच्या डिजिटल प्रणालींचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.




विशेष म्हणजे, ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची असणार आहे. या प्रणालीसंदर्भातील प्रारूप अधिसूचना महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मसुद्याचा अभ्यास करून निर्धारित ३० दिवसांच्या कालावधीत आपल्या सूचना आणि हरकती शासनाकडे सादर कराव्यात, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.




यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि सहसचिव संजय बनकर उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)