जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

प्रा. वैभव खानोलकर यांचा ‘श्रीस्थानक’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने गौरव

दादा सारंग • 29 October 2026, 01:27 PM

रत्नागिरी प्रतिनिधी✍️: कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ओळख असलेल्या दशावतार लोककलेचा अभ्यास, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करणारे प्रा. वैभव खानोलकर यांच्या ‘एक समृद्ध लोककला दशावतार’ या पुस्तकाला प्रतिष्ठेचा ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. पहिल्याच पुस्तकाला राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याने प्रा. खानोलकर यांच्या साहित्यिक योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




पुरस्कार सोहळ्यात प्रा. खानोलकर यांना धनादेश आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या लेखनातून दशावतार या लोककलेची साहित्यिक क्षेत्रात प्रभावीपणे दखल घेतली गेली असून, या पुरस्कारामुळे कोकणच्या लोककलेला मानाचे स्थान मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.




‘एक समृद्ध लोककला दशावतार’ या पुस्तकातून प्रा. खानोलकर यांनी दशावतार कलेचा समृद्ध इतिहास, परंपरा, कलावंतांचे योगदान तसेच या लोककलेचे सांस्कृतिक महत्त्व शब्दबद्ध केले आहे. दशावतार ही केवळ मनोरंजनाची कला नसून कोकणच्या लोकजीवनाशी, श्रद्धेशी आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेली परंपरा आहे, ही भूमिका त्यांनी आपल्या लेखनातून मांडली आहे.




पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना प्रा. वैभव खानोलकर म्हणाले, “हा पुरस्कार केवळ माझा वैयक्तिक सन्मान नाही. दशावतार कलेच्या जतनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा, या कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिकाचा आणि ही परंपरा पिढ्यान्‌पिढ्या जिवंत ठेवणाऱ्या सर्वांचा हा सन्मान आहे. मी या कार्यातील केवळ एक निमित्तमात्र आहे. त्यामुळे हा पुरस्कार दशावतार कलाक्षेत्रातील सर्व कलावंतांना समर्पित करतो.”




दशावतार रंगभूमीवरील कलाकारांची मेहनत, साधना, पारंपरिक कलेप्रती असलेली निष्ठा आणि रसिकांचे प्रेम यामुळे ही लोककला आजही जिवंत आहे. या कलेचा सखोल अभ्यास करून तिचे सांस्कृतिक महत्त्व साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रा. खानोलकर यांचा प्रयत्न या पुरस्कारामुळे अधोरेखित झाला आहे. एका पुस्तकाला मिळालेला हा सन्मान म्हणजे दशावतारच्या समृद्ध परंपरेला मिळालेली मानाची पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.




या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणेचे अध्यक्ष पद्माकर शिरवाडकर, कार्याध्यक्ष चांगदेव काळे, कार्यकारी विश्वस्त मकरंद रेगे, संजय चुंबळे, महादेव गायकवाड, दुर्गेश आकेरकर, वृषाली राजे आदी मान्यवर उपस्थित होते. मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील ऊर्फ बंधू साहेब मयेकर यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, पदाधिकारी आणि साहित्यप्रेमींचीही उपस्थिती होती.




प्रा. वैभव खानोलकर हे खानोली गावचे सुपुत्र असून सध्या ते रत्नागिरी येथील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालय, जाकादेवी येथे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या साहित्यिक यशाबद्दल साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)