जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

मत्स्यबीज केंद्र आणि वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाच्या कामासाठी पाठपुरावा

दादा सारंग • 14 October 2026, 11:28 AM

चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि चिपळूण शहराचा पूरधोका कमी करण्याच्या उद्देशाने मत्स्यव्यवसाय मंत्री मा. नितेश राणे यांच्यासमवेत मुंबई येथे बैठकीत आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघातील महत्त्वपूर्ण विषयांचा पाठपुरावा केला.या बैठकीत मौजे करंबवणे येथील शासकीय जमिनीवर मत्स्यबीज केंद्र उभारणे, मौजे पिंपळी खुर्द येथील जागा मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करणे, तसेच वाशिष्ठी नदीतील टप्पा-३ अंतर्गत गाळ उपशाचे काम मार्गी लावण्याबाबत चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली.मत्स्यबीज केंद्राच्या उभारणीमुळे स्थानिक स्तरावर मत्स्यबीज उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे मत्स्यशेतकऱ्यांचा बाहेरील स्रोतांवरील अवलंबित्व आणि वाहतुकीचा खर्च कमी होण्यास हातभार लागेल. मत्स्यपालन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक शेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि नवउद्योजकांना उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

तसेच मत्स्यबीज निर्मिती, संगोपन, विक्री, वाहतूक आणि संबंधित सेवांच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाचा प्रसार, स्थानिक पातळीवर कौशल्यविकास आणि मत्स्यव्यवसायाच्या विस्तारालाही या केंद्रामुळे चालना मिळू शकते.

दुसरीकडे, वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे काम मार्गी लागल्यास नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे चिपळूण शहरातील पूरधोका कमी करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल.मत्स्यव्यवसायाचा विकास, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि चिपळूणच्या पूरप्रश्नावर उपाययोजना या तिन्ही बाबींसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)