जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

मुंबईतील वायुप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना

दादा सारंग • 25 October 2026, 07:30 AM

मुंबई प्रतिनिधी ✍️: मुंबई आणि परिसरातील वाढते वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यांवरील धूळ, बांधकामाचा मलबा, औद्योगिक प्रदूषण तसेच वाहनांच्या प्रदूषणावर कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विभागांच्या समन्वयाने एकत्रित उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.




मुंबईतील वायुप्रदूषणाच्या प्रश्नासंदर्भात पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदूषणाच्या विविध कारणांचा आढावा घेण्यात आला. रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी केवळ झाडलोट न करता व्हॅक्यूम क्लिनिंग यंत्रांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच स्प्रिंकलरच्या माध्यमातून नियमित पाण्याची फवारणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.




बांधकामातून निर्माण होणारा मलबा वाहून नेणाऱ्या वाहनांना पूर्णपणे झाकणे बंधनकारक करण्यात येणार असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे. बांधकामस्थळी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे.




औद्योगिक प्रदूषणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ तपासणी न करता संबंधित उद्योगांकडून नियमांचे प्रत्यक्ष पालन होत आहे की नाही, यावर लक्ष केंद्रित करावे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. वारंवार तपासणी करूनही नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. मात्र, प्रत्येक उद्योग बंद करणे हा सरकारचा उद्देश नसून आवश्यक त्या सुधारणा करून घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.




या बैठकीला पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)