वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : महिलांचे संघटन, सक्षमीकरण आणि सामाजिक विकास या त्रिसूत्रीवर कार्यरत असलेल्या लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्लाच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी वेदिका विशाल परब यांनी महिलांनी एकमेकींच्या पाठीशी उभे राहून प्रगतीची वाटचाल करण्याचे आवाहन केले. प्रत्येक महिलेच्या अंगी विविध कला, कौशल्ये आणि क्षमता दडलेल्या असतात. त्यांना योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास महिला स्वावलंबी होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता इतर महिलांनाही सोबत घेऊन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
सेवाभावी वृत्ती, एकजूट आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून फाउंडेशनने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. ज्योती देसाई, सचिवपदी सौ. वृंदा गवंडळकर तर खजिनदारपदी डॉ. दिपाली देसाई यांची निवड करण्यात आली. तसेच काजल गिरप, सौ. आकांक्षा परब, दिपाली अभ्यंकर आणि सौ. शुभदा नवार यांचा सदस्य म्हणून नूतन कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.
फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण, महिला बचतगटांना प्रोत्साहन, महिला उद्योजिकांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच स्थानिक महिला उद्योजिकांच्या उत्पादनांसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
यासोबतच महिलांसाठी आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरे, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत, गुणवंत व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच महिला व मुलींसाठी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, सामाजिक प्रबोधन आणि आपत्तीच्या काळात मदतकार्य यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांमध्येही फाउंडेशन सक्रिय सहभाग घेणार आहे. महिलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविणे, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या माध्यमातून समाजविकासाला हातभार लावणे, हे फाउंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
महिलांनी महिलांसाठी एकत्र येत सामाजिक कार्याची जबाबदारी स्वीकारण्याच्या या उपक्रमामुळे वेंगुर्ल्याच्या सामाजिक क्षेत्रात महिला नेतृत्वाला नवी दिशा मिळणार आहे. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळणार असून, फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा नवा अध्याय या पदग्रहण सोहळ्याने सुरू झाला आहे.