कुडाळ प्रतिनिधी✍️ : कुडाळदेशकर ज्ञातीबांधवांना आनंद आणि समाधान देणारा केपीएल हा उपक्रम समाजातील एकोपा, सांघिक भावना आणि आपलेपणा वृद्धिंगत करणारा महत्त्वपूर्ण दुवा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून उभे राहिलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असून, केपीएल स्पर्धा भविष्यातही अखंडपणे सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती सर्व जबाबदारी घेण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा केपीएल कोअर कमिटीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. केवळ स्पर्धा आयोजित करण्यावर समाधान न मानता, या स्पर्धेतून किमान एक तरी गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्याचे ध्येय ठेवा. त्या खेळाडूच्या पुढील वाटचालीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोडा, असे आवाहनही त्यांनी केले.
गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था संकुलात रविवारी सायंकाळी आयोजित केपीएल अश्वमेध २०२५ गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 'तरुण भारत संवाद'च्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, बॅ. नाथ पै प्रशिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, कुडाळ हायस्कूलच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सुलभा देसाई, 'व्याध' साप्ताहिकाच्या संपादिका संजीवनी देसाई, कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई, गौड ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष तथा क्रीडा संघटक मनीष दाभोलकर, तेंडोली जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील, वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई आणि तेंडोली पंचायत समिती सदस्य मंगेश ऊर्फ भाऊ प्रभू उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि बॅ. नाथ पै महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नांदीनंतर सोहळ्याला सुरुवात झाली.
उदय सामंत म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत पुण्यातील ज्ञातीबांधवांनी एकत्र येत प्रचंड मेहनत आणि सहकार्याच्या बळावर केपीएलच्या माध्यमातून उल्लेखनीय उपक्रम उभा केला आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून केपीएलचा अश्वमेध यशस्वी झाला. भविष्यात अन्य ज्ञातींनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, एवढे मोठे आणि भरीव कार्य या माध्यमातून उभे राहिले पाहिजे. विविध संघर्षांना सामोरे जात आपल्या समाजाने राजकारणासह अनेक क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मराठी ही आपली मातृभाषा असली तरी मालवणी बोलीभाषेचाही प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. मालवणी भाषेतील आपुलकी, गोडवा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपणे गरजेचे आहे. आमदार निलेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये मालवणी भाषेचाही समावेश केला जाणार असून, मालवणी शब्दकोश तयार करण्याची संकल्पनाही आहे. आपल्या बोलीभाषेचे अस्तित्व आणि समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
केपीएलकडे केवळ क्रिकेट स्पर्धा म्हणून न पाहता समाजातील एकजूट आणि सांघिक भावना बळकट करणारे व्यासपीठ म्हणून पाहिले पाहिजे. या स्पर्धेला व्यावसायिक दृष्टिकोनातून पुढे नेण्याची गरज आहे. ज्ञातीतील खेळाडूंनी देशपातळीवरील मोठ्या टेनिस स्पर्धांमध्ये सहभागी होण्याइतकी गुणवत्ता संपादन करावी. तसेच रत्नागिरी येथे लवकरच यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी अकॅडमी सुरू करण्यात येणार असून, सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घ्यावा. ज्ञातीतील अधिकाधिक तरुण उच्च पदांवर अधिकारी व्हावेत, यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर समाजातील वंचित घटकांनाही अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे महत्त्वाचे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे शेखर सामंत यांनी क्रिकेटमध्ये वैयक्तिक कौशल्याइतकेच संघभावनेला महत्त्व असल्याचे सांगितले. हीच भावना समाज आणि ज्ञातीला अधिक बळकट बनवते. ज्ञातीतील तरुणांचा उत्साह, एकसंधपणा, सकारात्मक दृष्टिकोन आणि खिलाडूवृत्ती यामुळे केपीएलचा दहा वर्षांचा प्रवास यशस्वी झाला आहे. या प्रवासातील मैत्री, आठवणी आणि क्रीडाप्रेमाचा इतिहास जतन करणारा दस्तऐवज म्हणजे अश्वमेध गौरवग्रंथ असल्याचे त्यांनी नमूद केले.
मनीष दाभोलकर यांनी गौरवग्रंथाच्या निर्मितीमागील भूमिका विशद केली. केपीएलच्या दशकभरातील प्रवासातील महत्त्वपूर्ण घटना, प्रसंग आणि आठवणी अभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने या ग्रंथात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात कुडाळेश्वरचा समर्थ इतिहास लिहिला जाईल, तेव्हा केपीएल आणि अश्वमेध गौरवग्रंथाचा उल्लेख सुवर्णकाळ म्हणून केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीत कार्यकर्त्यांचे योगदान, नियोजन आणि सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात रणजित देसाई यांनी गौरवग्रंथाच्या निर्मितीसाठी घेण्यात आलेल्या परिश्रमांची माहिती दिली. हा ग्रंथ साकारण्यासाठी लेखक, साहित्यिक तसेच प्रतिष्ठान आणि गौड ब्राह्मण सभेच्या पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. केपीएलच्या दहा वर्षांच्या प्रवासात तीन वर्षे सिंधुदुर्गात स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला, ही विशेष आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात स्पर्धेचे आयोजन अधिक भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या समाजभवनासाठी सर्व ज्ञातीबांधवांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या गौरवग्रंथाच्या निर्मितीसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ. पूजा सामंत, ज्येष्ठ पत्रकार अनंत सामंत, वेदिका दाभोलकर आणि उमाकांत सामंत यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानचे सदस्य प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. या प्रकाशन सोहळ्याला प्रतिष्ठान व गौड ब्राह्मण सभेचे पदाधिकारी, सदस्य, केपीएलचे कार्यकर्ते आणि ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.