कणकवली प्रतिनिधी✍️ : कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या शेडची मागणी प्रवासी संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर ही मागणी पूर्णत्वास आली आहे. याचवेळी ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे स्थानकावर लिफ्ट उभारण्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले.
कोकण रेल्वे ही कोकणातील नागरिकांसाठी मुंबईसह राज्यातील तसेच देशाच्या विविध भागांशी जोडणारी महत्त्वपूर्ण वाहतूक व्यवस्था आहे. दररोज हजारो प्रवासी या रेल्वे सेवेचा लाभ घेत असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे अशा विविध सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, कणकवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. प्रवासी संघटनेनेही यासाठी सातत्याने मागणी केली होती. रेल्वे खात्याशी वेळोवेळी संपर्क साधून आणि पाठपुरावा करून ही मागणी मार्गी लावण्यात यश आले असून, आज या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे आपल्या भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी या रेल्वेचा वापर करतात. रेल्वेची प्रतीक्षा करताना प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यांची गैरसोय टाळता यावी, या उद्देशाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, निवारा शेडप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर लिफ्ट उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार लिफ्ट सुविधेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून, ही सुविधाही लवकरात लवकर प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या विविध मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात कणकवलीसह सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकणातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती पावले उचलली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला रत्नागिरीचे मंडल रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय किल्लेदार, गोकुळ सोनवणे (ए.एस.सी., रत्नागिरी), राजेश सुरवाडे (पीआय, आरपीएफ कणकवली), सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक राकेश राणे, दादू राणे, मेघा गांगण, पप्पू पुजारे, अमोल रासम आणि सागर राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.