जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करून निधी खर्चाचे नियोजन करा!

दादा सारंग • 27 November 2026, 12:40 PM

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मंजूर करण्यात आलेली विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच त्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य आणि वेळेत विनियोग होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे विकासकामांची प्रत्यक्ष प्रगती आणि आर्थिक नियोजन यांचा समतोल राखत निधी खर्चाचा वेग वाढवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.




जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा आणि निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विभागनिहाय कामांची सद्यस्थिती, प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, झालेला प्रत्यक्ष खर्च आणि अद्याप प्रलंबित असलेल्या कामांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.




विकासकामे प्रत्यक्षात पूर्ण होत असतानाच त्यासंदर्भातील आर्थिक व्यवहार आणि खर्चाची प्रक्रियाही वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी म्हणाल्या की, विशेषतः बांधकाम विभागाने पूर्ण झालेल्या कामांचे मोजमाप पुस्तक (एम.बी. रेकॉर्डिंग) वेळेत पूर्ण करावे. त्यामुळे संबंधित कामांची देयके अदा करणे आणि निधी विनियोगाची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करणे शक्य होईल. केवळ कामांची भौतिक प्रगती नोंदवून चालणार नाही, तर त्यासोबत आर्थिक प्रगतीही दिसून आली पाहिजे.




नगरविकास विभागांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांना गती देऊन ती निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच सर्व विभागांनी आपल्या कामांचा तपशील आणि निधी खर्चाची माहिती डॅशबोर्डवर नियमितपणे अद्ययावत ठेवावी. यामुळे विकासकामांच्या प्रगतीवर प्रभावीपणे देखरेख ठेवता येईल. शिवाय जिल्ह्यातील कामांची सद्यस्थिती आणि त्यावर झालेल्या खर्चाची माहिती पालकमंत्र्यांनाही दररोज उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.




सर्व विभागप्रमुखांनी आपल्या अखत्यारितील मंजूर कामांचा नियमित आढावा घ्यावा. अधिनस्त यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देऊन प्रशासकीय मान्यता, कामांची अंमलबजावणी, मोजमाप नोंदी आणि निधी खर्चासंदर्भातील कोणतीही प्रक्रिया प्रलंबित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. उपलब्ध निधीचा निर्धारित वेळेत विनियोग करतानाच मंजूर विकासकामांचा दर्जा आणि त्यातून अपेक्षित असलेला विकास साध्य होण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.




या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)