जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
आरोग्य

जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयातील चिमुकलीच्या मृत्यूची सर्वपक्षीय दखल

दादा सारंग • 01 November 2026, 05:08 AM

मुंबई प्रतिनिधी✍️: जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पीडित कुटुंबीयांच्या दुःखात विभागातील सर्व राजकीय पक्षांनी सहभागी होत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालयात सर्वपक्षीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना नेते तथा आमदार श्री. सुनील प्रभू आणि आमदार श्री. अनंत (बाळा) नर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी तातडीने करण्याचे निर्देश दिले.




चिमुकलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कथित प्रशासकीय त्रुटींची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी रुग्णालय प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.




पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी विभागातील सर्व नगरसेवकांसह शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भीम आर्मी तसेच इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.




घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सर्वपक्षीय स्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)