जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

हुमरमळा वालावल येथे १ नोव्हेंबरला मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिर

दादा सारंग • 30 October 2026, 11:14 AM

कुडाळ प्रतिनिधी✍️ : हुमरमळा (वालावल) येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ-गोवा आणि ग्रामपंचायत हुमरमळा यांच्या संयुक्त विद्यमाने १ नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांनी केले आहे.




या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादासाहेब साहिल यांच्या हस्ते होणार आहे.




हुमरमळा-वालावल परिसरातील अनेक रुग्ण उपचारासाठी गोवा येथील धारगळमधील आयुष रुग्णालयात जात असतात. रुग्णांना होणारा प्रवासाचा त्रास कमी व्हावा तसेच स्थानिक नागरिकांना त्यांच्या परिसरातच आयुर्वेदिक उपचार व आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.




केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे करण्यात आलेल्या विनंतीनंतर या शिबिरास मान्यता मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात येणार असून, रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप केले जाणार आहे.




पंचक्रोशीतील नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी या संधीचा लाभ घ्यावा आणि शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांनी केले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)