जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पीडितांना नुकसानभरपाई तातडीने द्या!

दादा सारंग • 27 November 2026, 02:16 PM

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमधील पीडित व्यक्तींना शासनाकडून देय असलेली नुकसानभरपाई आणि आर्थिक मदत विलंब न करता वितरित करावी. तसेच प्रलंबित प्रस्तावांवर शासनाच्या नियम व तरतुदींनुसार तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.




जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यात या कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांची सद्यस्थिती, पोलीस तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि पीडितांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.




बैठकीत पोलीस विभागाकडे तपासासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र विहित मुदतीत दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला दिल्या. पीडितांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.




समितीचे प्रभारी सदस्य सचिव तथा विशेष अधिकारी तुषार गवळी यांनी पोलीस तपासावर प्रलंबित असलेली प्रकरणे, मागील बैठकीच्या इतिवृत्तातील मुद्दे आणि पीडित व्यक्तींना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या प्रस्तावांची माहिती सादर केली.




याशिवाय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खुनाच्या प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या वारसांना शासकीय नोकरी अथवा निवृत्तीवेतनाचा लाभ देण्यासंदर्भात प्राप्त प्रस्तावांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.




या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता यांचे प्रतिनिधी वर्षा प्रभू, पोलीस निरीक्षक (नाहसं) ज्योती चव्हाण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे प्रतिनिधी समिधा ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, विशेष अधिकारी तुषार गवळी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)