जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

अंमली पदार्थांची अवैध निर्मिती व तस्करी रोखण्यासाठी रत्नागिरीत आढावा बैठक

दादा सारंग • 31 October 2026, 06:32 AM

रत्नागिरी प्रतिनिधी✍️: जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध निर्मिती, साठवणूक आणि तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को-कोऑर्डिनेशन (NCORD) जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्यावर यावेळी भर देण्यात आला.




जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




बैठकीत प्रभारी पोलीस अधीक्षक महामुनी यांनी रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात केलेल्या कारवाईचा आढावा सादर केला. जिल्ह्यात अंमली पदार्थांचे अवैध व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.




एमआयडीसी परिसरातील कंपन्यांची संबंधित शासकीय विभागांच्या समन्वयातून संयुक्त तपासणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच जिल्ह्याच्या सागरी सीमांवर विशेष देखरेख ठेवणे आणि परप्रांतीय कामगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.




अंमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि तस्करी रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून सतर्कतेने काम करण्याचे महत्त्व या बैठकीत अधोरेखित करण्यात आले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)