कणकवली प्रतिनिधी✍️ : हैदराबाद येथील रंगारेड्डी सीआरपीएफ कॅम्पमध्ये आयोजित २७ व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रतिनिधित्व करणारे स्वस्तिक सुनील सावंत आणि जितेंद्र सुरेश सावंत यांनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवत जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
स्वस्तिक सुनील सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून ते कणकवली तालुक्यातील तरंदळे गावचे रहिवासी आहेत. तर जितेंद्र सुरेश सावंत हे मुंबई पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत असून ते कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे सुपुत्र आहेत.
देशभरातील विविध राज्यांच्या पोलीस पथकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस संघाकडून खेळताना दोन्ही सावंत यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याची, मेहनतीची आणि सरावाची प्रचिती दिली. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही नावलौकिक उंचावला आहे.
पोलीस दलातील कर्तव्य बजावत असताना सांगीतिक क्षेत्रातही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविणाऱ्या या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. स्वस्तिक सावंत आणि जितेंद्र सावंत यांच्या या यशामुळे तरंदळे व नरडवे गावांसह संपूर्ण कणकवली तालुक्याची मान अभिमानाने उंचावली असून जिल्हा पोलीस दलातूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.