हुमरमळा प्रतिनिधी✍️: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आयुर्वेद आणि योग हा प्रभावी पर्याय आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा येथील डॉ. प्रशांत ससाणे यांनी केले. हुमरमळा-वालावल येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचा पंचक्रोशीतील सुमारे २५० रुग्णांनी लाभ घेतला.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा-धारगळ आणि ग्रामपंचायत हुमरमळा-वालावल यांच्या संयुक्त विद्यमाने धवल सांस्कृतिक सभागृह, हुमरमळा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रशांत ससाणे यांच्या हस्ते पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अतुल बंगे, उपसरपंच रश्मी वालावलकर, ग्राम अधिकारी अपर्णा पाटील, डॉ. रघवीर हडीमनी, डॉ. भार्गवी भिडे, डॉ. लतिशा कुमरपन, डॉ. पुरीन, कु. रीया गवस, पूजा कुबल, तेजस राणे, विनित गवस, सेजल नाईक, मधुरा शिरसाट, गायत्री भोसले, रोहित मेहरा, कुमार साक्षी, त्रुषभ पंकज, मालवी कुमारी, मनाली परब, सारथी रमाकांत भाईप, वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री. जंगम, हुमरमळा उपकेंद्राच्या डॉ. श्रद्धा परब, सौ. शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, संजना गुजकर आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. ससाणे म्हणाले की, जीवनाच्या प्रवासात आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्त्व मोठे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये योगाला अनन्यसाधारण स्थान असून, निरोगी शरीरासोबत सुसंस्कारित पिढी घडविण्याचे माध्यम म्हणूनही योगाकडे पाहिले जाते. आयुर्वेदामध्येही योगाला विशेष महत्त्व आहे.
गोवा-धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये पंचक्रोशीतील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असून त्यांना त्याचा लाभ होत आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून हुमरमळा येथे आरोग्य शिबिर घेण्यात यावे, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार लोकसेवेच्या भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे डॉ. ससाणे यांनी सांगितले.
शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल अडीचशे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर प्रत्येक रुग्णाला मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल सामंत यांनी केले.